कटिहार : बिहारच्या विकासासाठी एनडीएच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारची गरज असल्याचे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल (राजद) – काँग्रेस आघाडी भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने व्यापली असल्याची टीका केली. नवतरुण मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले, मी पहिल्यांदा मतदान केले तेव्हा माझे मत वाया जाऊ नये, अशी इच्छा होती. तुमचेही पहिले मत वाया जाणार नाही हा विचार करून मतदान करा. तुमचे पहिले मत सरकार स्थापन करणारे असावे.
एनडीएपूर्वी १५ वर्षे बिहारवर राज्य करणारा राजद आणि केंद्रात सहा दशके अखंडपणे राज्य करणा-या काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला. आरजेडीच्या ‘जंगल राज’मध्ये पोलिसही सुरक्षित नव्हते, असे ते म्हणाले. राजदने राज्यात काँग्रेस नेत्यांना खुजे केले आहे. राजदच्या पोस्टरवर काँग्रेस नेत्यांची छायाचित्रेच नाहीत, असे ते म्हणाले. २००५च्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजदने केंद्रात काँग्रेसशी हातमिळवणी करून बिहारचे प्रकल्प अडवले होते, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, ‘एक राज्यातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आणि दुसरे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. दोघे मिळून गरिबांसाठी येणारा पैसा लुटतात.

