बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत काँग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा वजा धमकी दिली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे स्वातंत्र्यापासूनचे योगदान सांगत आपल्या भाच्याला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये बराच काळ होते याची आठवण देखील करून दिली.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष जर संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असेल तर काय हरकत आहे. आपण सर्वजण लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष हा जवळून पाहिला आहे. मी, अजितदादा.. साहेब काय बराच काळ काँग्रेसमध्येच होते. मी स्वत: काँग्रेस पक्षाबरोबरच लढले आहे. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि मतांनीही निवडून आलेली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आम्ही सर्व काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. एवढेच नाही तर या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, यात काँग्रेस पक्षाने आपण जो मोकळा श्वास घेतोय तो श्वास आणि स्वातंत्र्य हे काँग्रेस पक्षाची देण आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे योगदान हे फार मोठे राहिले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर वक्तव्य केले होते. याबाबत सुप्रिया सुळेंना छेडले असता त्यांना थेट उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या, ‘मी ज्या संस्कारात वाढले आहे. तिथे अनुभवाने कर्तृत्वाने आणि वयाने मोठे असलेल्या व्यक्तींनी एकदा काही बोलले की त्याच्या पुढे बोलायचे नसते.’

