नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्याची जगभरात चर्चा होत आहे. भारतीय सैन्याचे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे प्रमुख तळ कशाप्रकारे उद्ध्वस्त केले, हे सा-या जगाने पाहिले. भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोठे विधान केले आहे. सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२५ ला संबोधित करताना एपी सिंग म्हणाले, ऑपरेशन सिंदूर एक राष्ट्रीय विजय आहे.
मी येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीयाचे आभार मानतो. मला खात्री आहे की, प्रत्येक भारतीयाने या विजयात योगदान दिले आहे. जसे वारंवार सांगितले गेले की, ही एक अशी कारवाई होती, जी सर्व एजन्सींनी, सर्व सैन्याने अतिशय मेहनतीने पद्धतीने पार पाडली. आम्ही सर्व एकत्र आलो अन् सर्वकाही स्वत:हून घडत गेले. आम्ही सत्याच्या मार्गावर चालत होतो, त्यामुळे देवही आमच्यासोबत होता. प्रत्येक भारतीयाला हा विजय हवा होता आणि तो या विजयाची वाट पाहत होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नौदल प्रमुख काय म्हणाले?
सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी म्हणाले युद्धाचे स्वरूप वेगाने बदलले आहे आणि ते अजूनही बदलत आहे. युद्ध आणि शांतता यांच्यातील रेषा अधिकाधिक अस्पष्ट होत चालल्या आहेत. आपल्याला हे देखील माहित आहे की, दहशतवादी कृत्यांसारखे अपारंपारिक धोके व्यापक संघर्षात बदलू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.