26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रही आत्महत्या नव्हे तर ‘संस्थात्मक हत्या’

ही आत्महत्या नव्हे तर ‘संस्थात्मक हत्या’

साता-याची घटना सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवणारी राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेला ‘संस्थात्मक हत्या’ असे म्हटले आहे.

साता-यातील घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. इतरांचे दुु:ख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक होतकरु डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली. गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनीच हा सर्वात घृणास्पद गुन्हा केला, असे ते म्हणाले.

वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मुलींसाठी भीती नाही, न्याय हवा
डॉक्टरच्या मृत्यूने भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

चार पानांची सुसाईड नोट समोर
सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरने २३ ऑक्टोबर भाऊबीजेच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. पीएसआय बदनेने तिच्यावर ४ वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत ५ महिन्यांपासून छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता चार पानांची सुसाईड नोट देखील समोर आली असून त्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएवरही आरोप आहेत. आता या प्रकरणावर राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR