नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले की, सरकारच्या हिंसेविरुद्ध ठामपणे उभे राहिलेल्या भारतातील तरुणांचे धैर्य कौतुकास्पद आहे. त्यांनी पुढे म्हटले की, भाजपच्या लोकांकडून होणारी गैरवर्तणूक, शिवीगाळ आणि हिंसेचा सामना करणा-या विद्यार्थिनींचेही कौतुक व्हायला हवे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा व्हीडीओही शेअर केला. या विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात पेपरफुटीच्या मुद्द्यावर तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले होते. राहुल आणि विद्यार्थ्यांमधील हा संवाद ५ ऑगस्ट रोजी झाला होता, परंतु त्याचा व्हीडीओ त्यांनी आज शेअर केला आहे.
यापूर्वी राहुल यांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांसोबत पत्रकार परिषद घेतली होती. राहुल गांधींनी ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील १० जनपथ येथे जंतर-मंतरवरील आंदोलकांसोबत पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले की, २० जुलै रोजी झालेल्या कॉकरोच पार्टीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठी आणि पॅलेट गनने हल्ला करण्यात आला. राहुल आपल्यासोबत चार आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माध्यमांसमोर घेऊन आले होते. एका विद्यार्थिनीने सांगितले की, भारत माता की जय म्हटल्यावर आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. आम्ही शांततेत चाललो असताना एका पोलिस अधिका-याने शरीराच्या वरच्या भागावर मारले.
३६ दिवस सीजेपीचे आंदोलन
दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीने २० जून ते २५ जुलैपर्यंत, सलग ३६ दिवस धरणे आंदोलन केले होते. या काळात हजारो विद्यार्थी, पालक आणि तरुण आंदोलनात सहभागी झाले. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक देखील आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी उपोषण केले. २० जुलै रोजी सीजेपीने संसद मार्च काढला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. २५ जुलै रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने धरणे आंदोलन संपवण्याची घोषणा केली होती.
















