मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कालच राज्य निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोळ निदर्शनास आणले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी बोगस मतदार असलेल्या मतदारसंघांची यादीच वाचून दाखवली. बोगस आधार कार्ड काढून बोगस मतदार नोंदणी कशी होते याचे प्रात्यक्षिक दाखवताना त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या यांचे आधारकार्ड तयार करून दाखवले. भाजपचा पदाधिकारी देवांग दवे यांच्याकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट चे काम असून त्यांच्या माध्यमातून मतदारयाद्यांमध्ये फेरफार होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघात हजारो बोगस नावे घुसवण्यात आल्याचा आरोप करताना याचे प्रात्यक्षिकच रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवून खळबळ उडवून दिली. मतचोरीचे मतदारसंघनिहाय आकडे सांगताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड त्यांनी पत्रकारांसमोर प्रिंट केले. अनेकांचे असे बोगस आधारकार्ड काढले गेले व त्या आधारे त्यांची मतदार नोंदणी करून मतदार ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये हजारो मतदार वाढले. शिरुर विधानसभा मतदारसंघाचे १०२३० बोगस नावे आहेत. वडगाव शेरीत ११६०४, खडकवासला येथून १२३३०, पर्वती मतदारसंघात ८२३८, हडपसर मतदारसंघात १२७७९ असे ५४००० नावे पिंपरी चिंचवडमध्ये वाढवली आहेत. आमचे कार्यकर्ते तिथे माणसं शोधायला गेली. पण एक सुद्धा माणूस तिथे सापडला नाही.
मतदानाच्या वेळी तिथे बसने तिथे लोकं आणली. तिथे मतदान करुन घेतल्यानंतर परत त्यांना बसने पाठवल्याचाअनुभव अशोक पवार यांनी सांगितला. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या काळात सर्वात जास्त मतदान हे पनवेलमध्ये वाढले आहे. इथे ६५००० मतदार वाढले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये ५७००० मतदार वाढले. भोसरीत ५६०००, मीरा भाईंदर ५३०००, नालासोपारा ५००००, चिंचवड ५४०००, हडपसर ४३००० मतदार अवघ्या सहा महिन्यांत मतदार वाढले आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला.
कोण आहे हा देवांग दवे?
निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचे इंटरनेट आणि त्यांची वेबसाईट सांभाळण्याची जबाबदारी देवांग दवे नावाच्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व माहिती असते. दवे भाजपचा पदाधिकारी असल्याने दवे यांच्याकडे सर्व माहिती होती. यादीत कुणाचे नाव घ्यायचं आणि कुणाचे नाव काढायचे हे दवेंनी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केले असे आमचे ठाम मत आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. मतदार याद्याची सर्व माहिती भाजपच्या पदाधिका-याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळते, मात्र आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला माहिती नाकारली जाते.
अचानक वाढलेले मतदार आधी कुठे होते, आत्ता या मतदारसंघात कसे आले याची माहिती आम्ही आगीतली आहे. आयोगाने लेखी स्वरुपात ही माहिती दिली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. शेवटच्या तासात ६८ लाख लोकांनी कसे मतदान केले हे सांगितले जात नाही. ही सर्व संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.
ट्रम्प तात्यांचे आधारकार्ड
बोगस आधारकार्ड काढून त्याद्वारे मतदारयादीत कसे नाव नोंदवले जाते याचे प्रात्यक्षिक रोहित पवार यांनी दाखवले. दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाला. जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे सांगत रोहित पवार यांनी एका संकेतस्थळावर ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
एका वेबसाईटवर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक – ००७, गल्ली पांढरा बंगला, गाव राशीन, जन्मतारीख-१८२५, लिंग – स्त्री आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन २० रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले. त्याची प्रिंट रोहित पवार यांनी काढून सर्वांना दाखवली. अशाच आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जाते. अशाचप्रकारे बोगस आधार कार्ढच्या आधारे अधिकारी डोळेझाकपणे नोंदणी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. देवांग दवे यांच्यावर यापूर्वी ही आरोप झाले तेव्हा त्यांनी याचा इंकार केला होता.
















