सोलापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्ह्यातील २६ संघटनांनी एकत्रित येत जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून चार हुतात्मा चौक ते पूनम गेट या मार्गावर मोर्चा काढून आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधले. याप्रसंगी अनेक शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी शासनाच्या व प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्या तात्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.
या आंदोलनात माजी प्राचार्य सुभाष माने, संस्थाचालक दशरथ गोप, मनोहर सपाटे, संघटनांचे प्रतिनिधी तानाजी माने, सुरेश गुंड, महेश सरवदे, गुरुनाथ वांगीकर, मेहबूब तांबोळी, अण्णासाहेब भालशंकर, सरदार नदाफ, डॉ. हरून रशीद बागवान, संग्राम कांबळे, सुबोध सुतकर, मुस्ताक शेतसंदी, जयवंत हाके, सर्जेराव जाधव, मोहन पाटील, श्रावण बिराजदार, दत्ता भोसले यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. मागील २०-२० वर्षापासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विनाअनुदानित शाळांवर वेतनाशिवाय काम करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू करण्याअगोदर येथील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे शिक्षक व शिक्षिका त्यांना दिसल्या नाहीत का? विनाअनुदानित तत्त्वावर काम करणा-या शिक्षिका मुख्यमंत्र्यांच्या भगिनी नाहीत का? अशी उपरोधिक टीका याप्रसंगी गुरुनाथ वांगीकर यांनी केली.
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी, पवित्र पोर्टलमधील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी, अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मान्यता मिळाव्यात, अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळातील रिक्त पदांची शंभर टक्के शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी. यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शासन व राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या जागा पवित्र पोर्टलद्वारेही वेळेत भरण्यात येत नाहीत. त्यामुळे साहजिकच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. राज्यातील माध्यमिक, प्राथमिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या त्वरित न सोडविल्यास बांगलादेश सारखी क्रांती भारतात घडवू सत्ता उलथून टाकू असा इशारा माजी प्राचार्य सुभाष माने यांनी दिला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागात कामानिमित्त येणा-या शिक्षकाकडे चिरीमिरी मागण्यात येते. त्याशिवाय कामे होत नाहीत. मात्र यापुढे शिक्षकांनी कोणता अधिकारी, कर्मचारी चिरीमिरीत मागत असेल तर थेट संघटनांशी संपर्क करावा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, प्रसंग पडल्यास दंडुका घेऊन येऊ. असा इशारा जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड यांनी दिला.