नांदेड : नांदेड येथील न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल येताच सोमवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. या मेलनंतर अवघ्या काही क्षणात संपुर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले. दुपारपासून न्यायालयामध्ये बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करत आहे. दरम्यान पोलिस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अफवांवर विश्र्वास न ठेवता सत्य परिस्थिती आम्ही तपासत आहोत, त्यानंतर माहिती जाहीर केली जाईल असे सांगितले.
सोमवारी कामकाजाचा पहिला दिवस असतांना नांदेडच्या न्यायालयात गर्दी होती. तर प्रत्येक बेंचवर काम सुरू होते. तोच दुपारी २.४५ च्या सुमारास एक पोलिस न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी ध्वनीक्षेपकावर न्यायालयातील पक्षकार, वकील, अधिकारी-कर्मचारी यांनी न्यायालय रिकामे करावे,आम्हाला तपासणी करायची आहे असे सांगत होते. काही क्षणातच बॉम्ब शोधक व नाशक पथकासह बॉम्ब शोधणारा श्वान हजर होताच न्यायालयाची तपासणी सुरू झाली. नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे हे सुध्दा न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ स्वत: आले. अजूनही पोलिस दलाची संपुर्ण टिम, जलद प्रतिसाद पथक बॉम्बचा शोध घेत आहेत.
हा ई मेल फक्त नांदेड जिल्ह्याच्या न्यायालयात आला नाही तर हिंगोली, बीड यासह राज्यातील आणखी काही न्यायालयांना आला आहे, अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान पोलिस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास करू नका पोलीस आपले काम करत आहेत आणि सर्व तपासणी झाल्यानंतर सत्य परिस्थिती जाहीर करणार आहोत असे सांगितले.
















