गंगाखेड : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील उरूसावरून गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी या गावी परत येत असताना दि. ८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आनंदवाडी गावातील तीन मित्र ठार झाले. या घटनेमुळे आनंदवाडी गावात शोककळा पसरली असून शुक्रवारी चूल पेटली नाही.
गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावचे तीन मित्र मोटारसायकलवरून (दुचाकी क्र. एमएच २४ बिई २९४०) किनगाव येथील उरूसाला गेले होते. या उरसावरून गावाकडे परत येत असताना लातूर जिल्ह्यातील किनगाव ते अंबाजोगाई या रस्त्यावर गुरूवारी रात्री ११.३०च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला स्विफ्ट कारने (क्र. एमएच ४६ ए.डी. ५८५४) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आनंदवाडी येथील संदिप बिभीषण चाटे (३२), विठ्ठल व्यंकटराव चाटे हे दोघे जागीर ठार झाले.
गंभीर जखमी असलेल्या अजय चंद्रकांत दराडे यांचा अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा किनगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
या अपघाताची वार्ता ग्रामस्थांना कळताच आनंदवाडी गावात शोकाकळा पसरली. त्यामुळे शुक्रवारी गावात चुलही पेटली नव्हती. दरम्यान तिघाचे मृतदेह गावात आणल्यानंतर ग्रामस्थ, महिलांना अश्रु अनावर झाले होते. शोकाकुल वातावरणात तिन्ही मित्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

