सूरत : गुजरातच्या सूरत येथे हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आणि कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत इच्छामरणाची मागणी केली आहे. किरिट पटेल या सूरतमधील रहिवाशाने जिल्हाधिका-यांना पत्र लिहिले आहे. त्यात जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही असा इशारा दिला आहे. किरिट यांनी त्यांच्या पत्नीवर मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
किरिट पटेल यांनी त्यांची पत्नी मनीषा चौहान यांच्यावर महिलांसाठी असणा-या कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, माझी पत्नी आधी मारहाण करते आणि त्यानंतर पोलिस हेल्पलाईन अथवा महिला हेल्पलाईन नंबरवर कॉल करून खोटे आरोप दाखल करण्याची धमकी देते. पत्नीने किरिट यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला असाही आरोप आहे. या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. किरिट आणि मनीषा यांचे हे तिसरे लग्न आहे. किरिट यांनी पत्नीवर चोरीचा आरोप करत काही महिला लग्नानंतर घरातील सामान घेऊन पळून जातात तर काही कायद्याचा वापर करून पती आणि त्याच्या कुटुंबाला कायदेशीर जाळ्यात अडकवतात असे म्हटले. या दुस-या श्रेणीत माझी बायको येते असे किरिट यांनी आरोप केला आहे.
न्याय मिळाला नाही तर जीव देईन
किरिट यांनी पोलिस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे अनेक चकरा मारल्या. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कुठलाही ठोस कायदा नाही. समाज आणि कायदा कायम महिलांना योग्य ठरवतो असा किरिट यांनी आरोप केला. जर पुढील ३ दिवसांत मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन असे सांगत किरिट यांनी जिल्हाधिका-यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. सध्या या पत्रामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
















