मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आपण जेवढे अभिवादन करू तेवढे कमी आहे. महामानवाने संविधान लिहिले आणि देश बदलवला, सर्व भेद संपवले. तसेच सर्व भेद संपवण्याचे काम संविधानाने केले आहे. भारत प्रगती करत आहे कारण भारताला सर्वाधिक चांगले संविधान दिले आहे. जगात सर्वांत मोठ्या प्रमाणात जयंती कोणाची होत असेल तर ती बाबासाहेब आंबेडकर यांची होते.
भगवान बुद्ध यांनी ‘अत् दीप भव:’ हा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या अर्थकारणाला जी दिशा दिली ती सर्वांत महत्त्वाची आहे. भारतात एक सेंट्रल बँक असली पाहिजे, असे बाबासाहेब यांनी सांगितले होते. आपल्या चलनाचे सिल्व्हर कोट संपवून गोल्डन कोट सुरू केले पाहिजे, म्हणून रिझर्व्ह बँक स्थापन झाली. याची मूळ कल्पना ही बाबासाहेब यांची होती. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती महोत्सव दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे निर्माते होते, तसेच ते माणुसकीचेही निर्माते होते. त्यांनी प्रथम निवडणूक लढवली त्यात त्यांचे निवडणूक चिन्हही माणूस होते. चवदार तळ्याच्या एका चळवळीने देशात सामाजिक क्रांती केली, जगात अनेक ज्ञानी, विचारवंत झाले. मात्र बाबासाहेबांनी त्यांचे ज्ञान स्वत:साठी न वापरता शोषित, वंचित, दीन-दलितांच्या उद्धारासाठी वापरले आहे. संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे. आज एक सर्वसामान्य व्यक्ती देशाच्या उच्च स्थानी विराजमान होतो. आमच्या सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होतात.. ही संविधानाची देण आहे. आमच्या सरकारचा डीएनए हा बाबासाहेब असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी प्रतिक्रियाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
मातीचे सोने झाले, भीमा तुझ्यामुळे, जीवनात आनंद झाला भीमा तुझ्यामुळे, चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी पिले आणि क्रांती झाली, बाबासाहेबांनी दिलेले संविधान हाच आपला आत्मा आहे. आम्ही इथे बसलो ते संविधानाची शपथ घेऊन बसलो. अदिवासी महिला राष्ट्रपती होतात, आणि मी शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालो ते बाबासाहेब यांच्यामुळे. भीमाची लाडकी लेक ज्योती वाघमारे संसदेत पोहोचली, बाबासाहेबांचा विचार हाच आमच्या सरकारचा डीएनए आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
















