Homeराष्ट्रीयसुरेंद्रनगरमध्ये ट्रकची धडक; सात ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

सुरेंद्रनगरमध्ये ट्रकची धडक; सात ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

राजकोट : वृत्तसंस्था
सुरेंद्रनगर-विरमगाम महामार्गावरील ‘भास्कर पराना पाटिया’ जवळ एक भीषण अपघात घडलाय. या भयानक अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झालाय. एका ट्रक चालकाने १० जणांना धडक दिली, ज्यापैकी सात जणांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले; त्यांनी ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

राजकोट जिल्ह्यातील ‘गढका’ गावातून भाविकांचा एक गट ‘डेकावाडा’ येथील महादेवजी मंदिराकडे पायी जात होता. याच दरम्यान, भरधाव वेगाने येणा-या एका ट्रक चालकाने ‘भास्कर पराना पाटिया’ जवळ या भाविकांना धडक दिली. या अपघातात पाच महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झालाय. इतर तीन जणांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. तपासादरम्यान हे सर्वजण ‘भरवाड’ समाजातील ‘मुंढवा’ कुटुंबाशी संबंधित असल्याचे समोर आले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम आता सुरू करण्यात आलं.

हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचे मृतदेह महामार्गावर विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. सध्या लखतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या टप्प्यावर सर्व मृतदेह सुरेंद्रनगर येथील लखतर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. जखमींना विरमगाम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मृत व्यक्ती राजकोट येथील असल्याने, त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयाकडे धाव घेत आहेत; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लखतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ते पुढील तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR