नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, ट्रॅक्टर कालव्यात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर कालव्याच्या बाजूने जात असताना कालव्यात पडल्याने झालेल्या अपघातात या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा तांडा शिवारात मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय अनिल राठोड (वय २८ वर्षे), लखन प्रकाश राठोड (वय २४ वर्षे) अशी मयत तरुणांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाभरा तांडा येथील अजय राठोड आणि लखन राठोड हे शेतीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन सोनाळा ते चाभरा रस्त्यावरील कालव्याच्या बाजूने जात होते. दरम्यान, अचानक चाभरा तांडा शिवारातील कालव्यात ट्रॅक्टर पडून अपघात झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील इतर शेतक-यांनी धाव घेतली. मात्र, कालव्यात पाणी सोडलेले असल्याने कालवा पूर्ण भरून वाहत होता. त्यामुळे दोघांना वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि दोघेही तरुण कालव्यातच ट्रॅक्टरमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर येता न आल्यामुळे जागेवरच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चाभरा तांडा येथे राहणारे अजय राठोड आणि लखन राठोड नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. याबाबत त्यांनी घरातील सदस्यांना देखील सांगितले होते. त्यामुळे मुलं शेतात गेली असल्याचे त्यांना वाटले. मात्र, रस्त्यात चाभरा तांडा शिवारातील कालव्याजवळ पोहोचताच त्यांचे ट्रॅक्टर कालव्यात पडले. नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी अधिक असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

