तेहरान : वृत्तसंस्था
मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत, या दोन्ही देशातील तणावामुळे जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
या युद्धात आता सामान्य लोकही सापडले आहेत. याचा परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. रविवारी रात्री तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मुलांच्या वसतिगृहाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. हे दोन्ही विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरचे आहेत.
दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना रामसर येथे हलवले आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून बाहेर काढले जाईल.
१,५०० विद्यार्थी अडकले
भारतावर तीन वर्षांनी पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती उद्भवली आहे. सुमारे १,५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाही. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. १०-१५ वेळा प्रयत्न केला तर कुठे जाऊन १ फोन लागत आहे, आमची मुले तिथे सुरक्षित नाहीत. सरकारने त्यांना बाहेर काढावे, असे आवाहन पालकांनी केले आहे. बहुतांश विद्यार्थी हे काश्मीरचे आहेत. इराण आणि काश्मीर यांचा जवळचा संबंध आहे. शिया बहुल मुस्लिम आणि इराण यांचा ऐतिहासिक संबंध असल्याने जेव्हा जेव्हा इराणवर हल्ला होतो तेव्हा काश्मीर घाटीत, कारगिलमध्ये हे मुस्लिम नागरिक आंदोलने करतात. यावेळीही केली आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.