नांदेड : नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पहिला धक्का सकाळी ७:४६ वाजता तर दुसरा धक्का सकाळी ९:४३ वाजता जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.३ आणि ४.५ इतकी मोजली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावाजवळ असल्याचे समोर आले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सुदैवाने नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आश्रय घ्यावा आणि प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच तंतोतंत पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या दिशा-सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कुठेही नुकसान झाले नसून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, भीती न बाळगता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
















