मुंबई : मुंबई विमानतळावर मंगळवारी रात्री मोठा विमान अपघात टळला. एकाच धावपट्टीवर दोन विमाने एकाच वेळी आल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष(एटीसी)ने वेळीच हस्तक्षेप करत एअर इंडियाच्या विमानाला टेकऑफ रद्द करण्याचे निर्देश दिल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलीगुडीहून मुंबईत आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे एआय१५४७ हे बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान धावपट्टीवर उतरले होते. ते धावपट्टी पूर्णपणे रिकामी करण्यापूर्वीच मुंबईहून दिल्लीकडे जाणा-या एअर इंडियाच्या एआय८१६ या बोईंग ७७७-३०० विमानाने उड्डाणासाठी धाव घेण्यास सुरुवात केली. दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर असल्याचे लक्षात येताच एटीसीने तातडीने एअर इंडियाच्या विमानाला ‘रिजेक्टेड टेकऑफ’ करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वैमानिकांनी उड्डाणाची प्रक्रिया सुरक्षितपणे थांबवून विमान पुन्हा बेमध्ये परत आणले.
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, एटीसीच्या सूचनेनुसार क्रूने तत्काळ टेकऑफ रद्द केला. नियमानुसार विमानाची आवश्यक तांत्रिक तपासणी केली जाणार असून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नसले तरी, एटीसीच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळल्याने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
















