पणजी : गोव्यात दोन रशियन महिला पर्यटकांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी संशयित रशियन नागरिकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक संशयिताने पाच जणांचा खून केल्याचा दावा केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. याच दरम्यान, समोर आलेल्या आसामी महिलेच्या मृत्यू प्रकरणातही संशयिताच्या सहभागाची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
गोव्यात हरमल येथे एलिना कास्तानोव्हा (३७) या महिलेचा गळा चिरुन खून केल्याचा प्रकार गुरुवारी (१५ जानेवारी) उघडकीस आला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी (१६ जानेवारी) मोरजीत एलिना वानिवा या महिलेचाही मृतदेह आढळून आला होता. दोन्ही महिला रशियन असल्याचे तपासात समोर आले आणि दोघींचाही गळा चिरुन खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.
पाच जणांचा खून केल्याचा दावा
मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी संशयित आलेक्सी लिओनोव (वय ३७, रा. मूळ रशिया) याला अटक केली आहे. आलेक्सीने पाच जणांचा खून केल्याचा दावा केला आहे. संशयिताच्या या दाव्याने पोलिसही चक्रावले असून यात तथ्य आहे की नाही याचा आता तपास केला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आलेक्सी मानसिकदृष्ट्या स्थीर नसल्याचे समोर आले आहे. आलेक्सी रशियन महिलांसोबत मैत्री करत असे नंतर गळा चिरुन अथवा कोंडून त्यांचा खून करत असे अशी संशयिताने पोलिसांना माहिती दिली आहे.
आसामी महिलेच्या मृत्यूचे गूढ
१४ जानेवारी रोजी एका आसामच्या मृदुस्मिता सायकीया या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. पण, अमली पदार्थ देऊन लाकडी काठीने मृदुस्मिता सायकीयाला जीवे मारल्याचा दावा आलेक्सीने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल अशी माहिती दिली आहे. याप्रकरणातही संशयित आलेक्सीचा संबंध आहे का? याचीही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
आर्थिक वादातून खून
संशयित आलेक्सीचे सर्व दावे खरे मानता येणार नाहीत. त्याची कोणासोबत मैत्री होती आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यानेच तो खून केला असे म्हणता येत नाही असे एक वरीष्ठ पोलिस अधिका-याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. आलेक्सीने आणखी एका रशियन व्यक्तीचा खून केल्याचा दावा केला आहे. पण, त्याने वर्णन केलेला मृतदेह अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही असे सूत्रांकडून समजते.

