श्रीक्षेत्र माहूर : इलियास बावाणी
पालाईगुडा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघात एक जण जागीच ठार झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
माहूरच्या घाटात शुक्रवारी अपघात होऊन तीन भाविक ठार झाल्याची घटना घडली होती. तोच शनिवार १७ रोजी हा दुसरा अपघात झाला आहे. केळापूर येथून दर्शन घेऊन सारखणी मार्गे गोंडवडसा येथे दुचाकी क्र एमएच २६ बीआर ९१५४ वरून गजानन शंकर आशेवाड वय २८, कुंदन किशोर बावणे वय ३०, अतुल रमेश बावणे २० हे तिघे जात होते.
तर माहूरवरून दर्शन करून दुसरी दुचाकी एमएच २९ एक्यू ९१४० वर असलेले बाळू गोपा जाधव वय ५५, आकाश प्रल्हाद जाधव वय ३७ हे दोघे रा. दराटी तालुका किनवट हे दोघेजण परत जात होते. या दोन्ही दुचाकींची पालाईगुडा फाटा येथे बारजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात हे पाचही जण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. ही माहिती मिळताच सपोनी संतोष जोंधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया जुने यांनी गजानन आशेवाड यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी आदिलाबाद यवतमाळ येथे पाठविण्यात आले.
















