नांदेड : प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ४ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत २ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख १५ हजार किंमतीच्या ४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पथकासह गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी शिवाजी उर्फ पवन दत्तराम वडजे ( रा. व्यंकटेशनगर, उमरी) याला शंकरराव चव्हाण उड्डाणपुलाजवळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार महेश साहेबराव तोडे ( रा. अंतरगाव, ता. नायगाव) याच्यासह दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
आरोपींच्या कबुलीनुसार अंतरगाव (ता. नायगाव) येथील शेतातील आखाड्यावर लपवून ठेवलेल्या ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत २,१५,००० इतकी आहे. या दुचाकी वजीराबाद व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडे सोपविण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे तसेच पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, मोहन हाके, महेश बडगु, लहू चाटे व आबाराव पिंगळवाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
















