याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश निर्मळ याने गावाकडे जाण्यासाठी मित्र गणेश कांबळे (रा. नरळद) याच्याकडून अर्टिगा कार (क्र. एमएच ०६ बीएम ६११०) घेतली होती. दुपारी मानवतकडून परभणीकडे जात असताना रेल्वे उड्डाणपुलावर कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार प्रथम पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून समोरून येणा-या आयशर ट्रकला (क्र. एमएच २६ एडी १४०१) धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघाताचा आवाज ऐकून कोल्हा येथील दिनेश भिसे, मुंजाभाऊ भिसे, पुरुषोत्तम तारे, मधुकर ढाकरगे, युवराज भिसे आणि योगेश फंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार मधील दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच मानवतचे पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, शीतल बोर्डे, हवालदार राजू इंगळे, प्रकाश खंदारे व अविनाश डंबाळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आयशर ट्रकचा चालक ईश्वर मोतिराम कोल्हे (रा. मगर सावंगी, ता. लोहा, जि. नांदेड) हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत.

















