नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आज, सोमवारी भारत दौ-यावर येत आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा अतिशय संक्षिप्त असून ते फक्त ९० मिनिटे (दीड तास) भारतात असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विशेष आमंत्रणावरून ते या दौ-यावर येत आहेत. जागतिक राजकारणातील वाढता तणाव पाहता, ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेख मोहम्मद बिन जायद यांचे विमान संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी दिल्लीत लँड होईल. त्यानंतर ४ वाजून ४५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. ही भेट आटोपून ते संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा रवाना होतील.
दौरा संक्षिप्त असला तरी महत्त्वाचा का?
द्विपक्षीय व्यापार
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत आणि वअए मधील व्यापार १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत १९.६ टक्क्यांनी वाढला आहे.
जागतिक तणाव
रशिया-चीन विरुद्ध अमेरिका, व्हेनेझुएलातील अस्थिरता आणि मध्यपूर्वेतील इराण-सौदी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि यूएईमधील समन्वय जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरणार आहे.
दहा वर्षांत पाचवा दौरा
राष्ट्राध्यक्ष नाहयान यांचा गेल्या १० वर्षांतील हा पाचवा भारत दौरा आहे, तर राष्ट्राध्यक्ष म्हणून ही त्यांची तिसरी भेट आहे. हे दोन्ही देशांमधील वाढत्या मैत्रीचे प्रतीक आहे.

