22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्र५ जुलैच्या मोर्चात राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेही सहभागी होणार

५ जुलैच्या मोर्चात राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेही सहभागी होणार

आंदोलनाप्रमाणे राजकारणात एकत्र येणार का ?

मुंबई : प्रतिनिधी
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदीचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे ठाकरे बंधू ५ जुलैच्या मोर्चात एकत्र येणार आहेत. पक्षांचा झेंडा बाजूला ठेवून केवळ मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येण्याच्या राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैच्या सहभागी होण्याचे मान्य केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५ जुलैला हिंदीसक्तीविरोधात दोन्ही पक्षाचा एकच मोर्चा निघणार असल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलात बैठक होऊन त्यात मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजकीय व्यासपीठावर प्रथमच दोन ठाकरे एकत्र येणार असून, महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी घडामोड असणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा व पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्यभर वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीसक्तीविरोधात ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही याच विषयावर २९ जून व ७ जुलै रोजी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.

मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल, असे स्पष्ट करत सर्वपक्षीय लोकांनी, पालक आणि विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी आपण स्वतः सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी परवाच स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे यांना पण आपण बोलावणार का या प्रश्नावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत ते पण आलेच ना असा प्रतिप्रश्न करताना, त्यांच्याशीही मी बोलणार आहे. माझी माणसे त्यांच्या माणसांशी बोलतील असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला आणि एकत्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. खा. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

राज ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क करून, हिंदी सक्ती विरोधात, मराठी भाषेसाठी एकत्र आले पाहिजे, दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले. ५ तारखेला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. त्याला विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचे ओझे आमच्या मुलांना पेलवणार नाही, असे भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रतून गुजरात राज्याला मात्र वगळले असून महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे. राज्याच्या मनात जे आहे, ते मी करेन, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते. सुप्रिया सुळे यांनी देखील या विरोधात भूमिका मांडली होती.

त्यामुळे हा सर्व निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील आहे. आम्हाला लढावे लागेल आणि त्याचे नेतृत्व ठाकरेंनी करावे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच पाहिजे, ही महाराष्ट्राची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या मनातही तेच आहे. या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असे राऊत म्हणाले. मोर्चा कसा असेल? वेळ कोणती असेल? याविषयी आम्ही आता चर्चा करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे.

सकाळी १० वाजेची वेळ निश्चित झाली होती. मात्र, ती वेळ सोईची नाही, त्यामुळे या वेळेत बदल करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे हे नवे समीकरण पुढील काळात अधिक व्यापक होणार का ? याकडे लक्ष असणार आहे.

मोर्चानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल!
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकत्र येणार असून हा राजकीय मोर्चा नसून याचे नेतृत्व मराठी माणूसच करणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संजय राऊतांशी चर्चा केली. सर्वानुमते ५ जुलै ही मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष, साहित्यिक, मराठी माणूस एकत्र येणार आहेत. मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी पुढाकार घेतला. यासाठी मी त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा कायम ऋणी राहील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येतील की नाही त्याचा दोन भाऊ निर्णय येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले. गळचेपी करायचा प्रयत्न केला तर मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देईल. हा मोर्चा ना राज ठाकरेंचा आहे ना उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा फक्त मराठी माणसासाठी असणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नसेल, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्व राजकीय पक्षाशी संवाद साधणार आहोत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना, भाजप सर्व जे जे मराठीवर प्रेम करतात ते सर्व सहभागी होतील, असे संदीप देशपांडे म्हणाले.

एकत्र आंदोलनाचा निर्णय झाल्यानंतर मोर्चाची पूर्वतयारी करण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या जिप्सी या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली. यावेळी बोलताना वरुण सरदेसाई यांनी, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला.

हा मोर्चा भव्यदिव्य असला पाहिजे. यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करायचे, यासाठी आमची आजची भेट आहे. आम्ही प्रत्येकवेळी कॅमेऱ्यासमोर भेटतो असे नाही. आम्ही एरवीही एकमेकांना भेटत असतो. राजकारणापलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. ५ जुलैच्या मोर्चाविरोधात काही मराठी द्वेष्टे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांनी आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवून देऊ. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही आपापसातील मतभेद दूर ठेवण्यासाठी तयार आहोत, असे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्या वक्तव्यानंतर मनसेला लगेच टाळी दिली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR