जालना : मराठा आरक्षणाच्या नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्यावरून राज्य सरकारला आणि बावनकुळेंना मनोज जरांगे यांनी इशारा दिला असून तुम्ही केलेली चूक २८ ऑगस्टच्या आत पत्र देऊन दुरुस्त करा. जी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, ती पुन्हा वैध करा आणि समाजाला द्या, आमचे काहीही म्हणणे असणार नाही. मात्र, जर ही चूक सुधारली नाही, तर पुन्हा मी तुम्हाला सोडणार नाही असा सक्त इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली होती. बावनकुळेंच्या या भावुक व्हीडीओवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली असून पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, मला पत्रकारांनी सांगितले की चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांसमोर बोलताना भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. रात्री मी त्यांचा तो व्हिडीओ पाहिला. त्यांनी त्यात त्यांच्या आईचा उल्लेख केला. तसेच, आपण मराठ्यांच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मी माझ्या मराठा समाजावर खूप प्रेम करतो. मराठा समाजाच्या विरोधात जर कुणी मराठा आला तरी मी त्याला सोडत नाही, मग दुसरा कुणी आला तर त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही व्हीडीओत आईचे नाव घेतले आणि तुम्ही व्यथित झालात, हे पाहून मलाही वाईट वाटले. आम्ही मराठे आहोत, आम्ही एकदा-दोनदा माफ करून सोडून देतो. त्यामुळे मी तुम्हाला यावेळी माफ करतो आणि इथून पुढे तुमच्यावर कोणतेही व्यंग करणार नाही.
परळीच्या टोळीच्या नादी लागल्याने रडण्याची वेळ
बावनकुळेंना माफ करत असतानाच जरांगे पाटलांनी त्यांच्यावर राजकीय निशाणाही साधला. ते म्हणाले, तुम्ही इतके रडकुंडीला आलात, कारण तुम्ही मराठ्यांच्या नादी लागलात. मला तुमच्याबद्दल इतके बोलण्याची गरज नव्हती, पण तुम्ही मोठी चूक केलीत. परळीच्या टोळीच्या नादी लागून आणि त्यांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे केले, म्हणूनच तुमच्यावर आज ही रडकुंडीची वेळ आली आहे. त्यामुळे इथून पुढे तरी तुम्ही त्यांचे ऐकणे बंद करा.
















