दुुबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये विमान वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा मोठा फटका भारतीय प्रवाशांना बसला असून एअर इंडियाने रविवारी आपल्या अनेक विमानफे-या रद्द केल्या आहेत तर इंडिगोने विमान प्रवासाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.
यूएई विमानतळ प्राधिकरणाने विमान कंपन्यांना त्यांचे उड्डाणे कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात एक्सवर माहिती देताना एअर इंडियाने म्हटले की यूएईकडून प्राप्त झालेल्या ताज्या सूचनांनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला १५ मार्च २०२६ रोजीच्या आपल्या तात्पुरत्या विमानफे-या कमी कराव्या लागत आहेत. शारजाहून दिल्ली, कन्नूर, कोची, कोझिकोड, मुंबई आणि तिरुवनंतपुरमसाठी विमानफे-या सुरू ठेवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. तसेच, स्लॉट उपलब्धतेनुसार रास अल खैमाह ते कोझिकोड आणि कोची सेवा चालवल्या जातील. ज्या प्रवाशांची विमाने रद्द झाली आहेत, त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुढील तारखेचे तिकीट बुक करण्याचा किंवा पूर्ण परतावा घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
इंडिगोकडून वेळापत्रकात बदल
इंडिगोनेही प्रवाशांना दुबईतील निर्बंधांबाबत सतर्क केले आहे. कंपनीने म्हटले आहे की मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीमुळे दुबईतील विमान वाहतुकीवर निर्बंध आले असून वेळापत्रकात बदल झाले आहेत. प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या विमानाची स्थिती तपासून घ्यावी.
इंधन दरवाढीचे संकट
पश्चिम आशियातील या संकटामुळे केवळ वाहतुकीवरच परिणाम झाला नाही, तर विमान इंधनाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. वाढता खर्च भरून काढण्यासाठी इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर यांसारख्या कंपन्यांनी आधीच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर फ्यूल सरचार्ज लागू केला आहे.

