नाशिक : राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी (ता.११) सायंकाळनंतर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले आहे. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, निफाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव, मनमाडसह परिसरात विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी, नाशिक जिल्ह्यात वादळी वा-यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे (वल्ल२ीं२ङ्मल्लं’ फं्रल्ल) जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रभर वीज गायब होती. तर सकाळी देखील वीजपुरवठा पूर्ववत होण्यास मोठा अवधी लागल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यात झाडे कोसळली
दरम्यान, पुण्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ३० ठिकाणी झाडेपडीच्या घटना घटल्या आहेत.
पिकांचे मोठे नुकसान
तर धुळ्या अवकाळी पावसाने आज (ता.१२) पहाटेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वा-यासह आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, त्याचबरोबर भुईमुग आणि उन्हाळी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकसह मालेगाव परिसरातील द्राक्ष बागांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सिंधुदुर्गमध्येही पावसाची हजेरी
याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील काही भागात आज (ता.१२) मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. मात्र, असे असले तरी उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.