नवी दिल्ली : लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फाईल्सचा मुद्दाही लोकसभेत उपस्थित केला. तसेच एपस्टीन फाईल्समध्ये नाव आले असल्याचा दावा करण्यात येत असलेले उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव घेत सरकारवर प्रश्नांची बरसात केली.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, अनिल अंबानी नावाचे एक उद्योगपती आहेत. माझा प्रश्न आहे की ते अद्याप तुरुंगात का गेलेले नाहीत. याचे कारण आहे हे म्हणजे एपस्टाईन फाईल्स. त्याबरोबरच मला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनाही विचारायचे आहे की, त्यांची एपस्टाईनशी ओळख कुणी करून दिली. हरदीप सिंग पुरी यांची एपस्टाईन याच्याशी ओळख कुणी करून दिली याची माहिती माझ्याकडे आहे आणि ते पुरी यांनाही माहिती आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
दरम्यान, एपस्टाईन फाईलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मला पंतप्रधानांच्या डोळ्यांत भीती दिसत आहे. त्याची दोन कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे एपस्टाईन. राहुल गांधी यांनी केलेल्या या उल्लेखानंतर पीठासीन अधिका-यांनी त्यांना ताकिद दिली. मात्र राहुल गांधी थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पावर कुणाचे तरी नियंत्रण दिसत आहे आणि ते आहेत मिस्टर अदानी. अदानी एक सर्वसामान्य उद्योगपती नाहीत. तसेच त्यांची कंपनीही सर्वसामान्य नाही. त्यांच्या कंपनीवर अमेरिकेमध्ये एक खटला दाखल झालेला आहे. तसेच त्यांचे लक्ष्य अदानी नव्हे तर पंतप्रधान आहेत. ही कंपनी भाजपचा आर्थिक आधार आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

