पटाया : पश्चिम आशियातील अत्यंत तणावपूर्ण सागरी भागात तब्बल ९ महिन्यांहून अधिक काळ कर्तव्य बजावल्यानंतर, अमेरिकेची अणुऊर्जेवर चालणारी महाकाय विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ बुधवारी सकाळी थायलंडच्या ‘लाम चाबांग’ बंदरावर दाखल झाली आहे. या युद्धनौकेसोबत अमेरिकन नौदलाची आणखी दोन लढाऊ जहाजेही पोहोचली आहेत.
युद्धनौकेवर तैनात असलेल्या सुमारे ५,००० नौसैनिकांना सलग नऊ महिन्यांच्या कठीण सागरी सेवेनंतर विरंगुळा मिळावा म्हणून बंदरापासून सुमारे ९६ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन शहर पटाया येथे ५ दिवसांच्या सुट्टीसाठी नेण्यात येत आहे. सैनिक पटायामध्ये दाखल होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि नौदल अधिका-यांनी त्यांच्यावर काही कडक निर्बंध लादले आहेत. पटाया शहर हे आपल्या नाईटलाईफ आणि अॅडल्ट बार्ससाठी जगप्रसिद्ध आहे. यातील प्रसिद्ध सोई ६ भागात अनेक एडल्ट एंटरटेनमेंट बार्स आहेत. अमेरिकन सैनिकांना पटायाच्या नाईटलाईफचा आनंद घेण्याची मुभा असली, तरी सोई ६ या भागात जाण्यास त्यांच्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.
ड्रग्ज आणि गांजापासून दूर राहण्याचे निर्देश
थायलंडच्या पोलिसांनी सैनिकांना देशात देहव्यापार कायदेशीररीत्या प्रतिबंधित असल्याची जाणीव करून दिली आहे, तसेच अमली पदार्थ आणि गांजा विकणा-या दुकानांपासून दूर राहण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
५० सेक्स वर्कर्स ताब्यात
रॉयटर्सनुसार, अमेरिकन नौसैनिक येण्यापूर्वी पटाया पोलिसांनी शहरात अचानक छापे टाकून थायलंड, लाओस आणि युगांडातील सुमारे ५० महिला सेक्स वर्कर्सना ताब्यात घेतले. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
स्थानिक अर्थव्यवस्थेला कोट्यवधींचा फायदा
५ हजार अमेरिकन सैनिक पटायामध्ये ५ दिवस मुक्काम करणार असल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स, बार, खरेदी केंद्रे आणि वाहतूक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका नौसैनिकाकडून हॉटेल, खाणे-पिणे आणि मनोरंजनावर दररोज १,००० ते ३,००० थाई बाहत (सुमारे २,८०० ते ८,५००) खर्च होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या या मुक्कामादरम्यान स्थानिक बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची थेट आर्थिक उलाढाल होणार असून पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
अमेरिकन सैन्य आणि पटाया
शहराचा ऐतिहासिक संबंध
पटाया शहराचा इतिहास अमेरिकन सैन्याशी थेट जोडलेला आहे. १९६० च्या दशकात व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकन सैनिक सुटी घालवण्यासाठी पटायामध्ये येऊ लागले. त्या काळात पटाया हे केवळ एक छोटे मासेमारीचे खेडेगाव होते. सैनिकांच्या ओघामुळे हॉटेल्स, बार आणि मनोरंजनाचा व्यवसाय वाढला. १९७८ पर्यंत पटायाला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा मिळाला आणि पुढे हे शहर जागतिक पर्यटन व नाईटलाईफचे प्रमुख केंद्र बनले.
















