23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वंचित आघाडीचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वंचित आघाडीचा पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुले पत्र मनोज जरांगे-पाटील यांना लिहिले असून मनोज जरांगे-पाटील यांनी आपली तब्येत सांभाळणे आवश्यक असून त्यांनी किमान नारळाचे पाणी तरी प्यावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी या पत्राद्वारे केले आहे.

मराठा आरक्षणाची तीव्रता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून निवडून गेलेले जे खासदार आणि आमदार आहेत त्यांच्या घरांसमोर निदर्शने करावीत तरच ते जागेवरून हलतील. यामुळे आपण या उपोषणाला त्या दृष्टीने योग्य वळण द्यावे, अशी विनंती आम्ही आपल्याला करीत आहोत. या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांची आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरवस्था यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे. पुन्हा एक वेळ आवाहन करतो की, आपण स्वत:चा जीव सांभाळावा.

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येऊन गेले; परंतु त्यांनीदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेखदेखील केला नाही. या पूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिकादेखील ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच आहे त्यामुळे आता आंदोलन करीत राहाणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. आपण पाणीसुध्दा घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR