पूर्णा : ब्रिटिश काळापासून रेल्वे वारसा जपणारे आणि एकेकाळी विभागीय रेल्वे केंद्र म्हणून नावाजलेल्या पूर्णा जंक्शनच्या पदरी उपेक्षा आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून सुरू होणा-या वंदेभारत एक्सप्रेस गाडीचा विस्तार मुंबईपर्यंत करण्यात आला आहे. परंतू या एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात पुर्णेकरांना ठेंगा दाखवण्यात आला असून पुर्णेकरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदेड येथून सकाळी ५ वाजता सुटणारी २०७०५ वंदेभारत एक्सप्रेस परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर मार्गे मुंबई सीएसटीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात २०७०६ मुंबईहून दुपारी १.१० ला सुटून रात्री १०.५० वाजता नांदेड येथे पोहचणार आहे. परंतू या प्रवासात पूर्णा स्थानकाला थांबा देण्यात आलेला नसल्याने पुन्हा एकदा पुर्णेकरांना डावलण्यात आल्याची भावना रेल्वे प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
पूर्णा हे महत्वाचे रेल्वे जंक्शन असून दररोज हजारो प्रवासे येथून प्रवास करतात. नांदेडच्या आणि परभणीच्या मध्यभागी असलेल्या पूर्णा रेल्वे जंक्शनला थांबा न मिळणे म्हणजे येथील नागरीकांचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून पूर्णा जंक्शनकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण रेल्वे प्रशासनाने अवलंबले आहे. एकेकाळी येथे लोकोशेड, रेल्वे वर्कशॉप, विभागीय कार्यालय असलेले हे स्टेशन आज मात्र भकास स्टेशन बनले आहे. अनेक वेळा मागण्या करूनही रेल्वे स्थानकावर अंधार, अस्वच्छता आणि पाकीटमारांचा धुमाकूळ यासाठीच प्रसिध्द राहले आहे.
वंदेभारत सारख्या आधुनिक सेवेपासून पूर्णेकरांना दूर ठेवले जाणे रेल्वे अधिका-यांच्या उद्दामपणाचे लक्षण आहे, असा संताप नागरिकांमध्ये उसळला आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ वंदेभारत एक्सप्रेसला पूर्णा स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांतून केली जात आहे.