वाराणसी : पंतप्रधान मोदींनी रविवारी वाराणसीतील नमो घाटावर एअर शो पाहिला. या शोमध्ये १०० विमानांनी सहभाग घेतला. यामध्ये राफेल आणि सुखोईसारख्या ५२ लढाऊ विमानांचाही समावेश होता. पंतप्रधान मोदींसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी यांनीही एअर शो पाहिला. एअर शोमध्ये राफेल विमानाने कमी उंचीवर कसरती दाखवल्या. विमान वर जाताना अचानक खाली वळत होते, तर कधी गोल चक्कर मारत होते. त्याचप्रमाणे सुखोई-३० एमकेआय विमानानेही कमी उंचीवर हवाई कसरती दाखवल्या. चेतक हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.
सी-१७ ग्लोबमास्टर आणि नऊ सूर्यकिरण हॉक विमाने एकत्र उड्डाण करत मंचाच्या वरून गेली. सूर्यकिरण पथकातील विमानांनी आकाशात शानदार कसरती दाखवल्या. राफेल, सुखोई, जग्वार, मिराज-२०००, तेजस आणि मिग-२९ यांनी बाणाच्या टोकाच्या आकारात उड्डाण केले. हे दृश्य ऑपरेशन सिंदूरसारखे होते. भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या स्थापना दिनानिमित्त एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विंग्स ओव्हर गंगा असे नाव देण्यात आले होते.
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी रूपापूर येथे १०० कोटी रुपयांच्या अरविंद टेक्सटाइल मिलचे उद्घाटन केले. त्यानंतर पोलिस लाइनपासून ७ किमी लांबीचा रोड शो करत ते नमो घाटावर पोहोचले.
















