मुंबई/पुणे : भेंडी, कोबी, गवार, हिरवे वाटाणे, कारलं, वांगी, बटाटे यांसारख्या भाज्यांचे दर वाढले आहेत. तर स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले लसूण आणि आले यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
‘एल निनो’मुळे यावर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशातल्या अनेक भागांमधील पाऊस दूर पळाला आहे. उशिरा आलेला मान्सून आणि उष्णता यांमुळे अंडी आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपर्यंत ७४ ते ८० रुपयांपर्यंत अंड्यांचे दर घसरल्यानंतर आता पुन्हा भाव वाढले आहेत. अंड्यांचे दर सध्या ९० ते ९६ रुपये प्रति डझनपर्यंत वाढले आहेत.
मुंबईत काही ठिकाणी अंडी ९६ रुपये प्रति डझन दराने विकली जात आहेत. कडक उन्हाळ्यामुळे उत्पादन घटले आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.दुसरीकडे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमधील तयार जेवणाचाही खर्च वाढला आहे. भाजीपाल्याच्या दरात हळूहळू होणा-या वाढीमुळे घरखर्च चालवणंही सर्वसामान्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. पुरवठा स्थिर नसल्याने किमती अचानक वाढत आहेत. तीव्र उष्णतेमुळे पिकांचेही नुकसान होत आहे. दरम्यान, आगामी काळातही जर पाऊस पडला नाही, तर आवक आणखी घटून सीताफळांचे बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता व्यापा-यांकडून वर्तवली जात आहे. पाऊस लांबल्याने पुरंदरचे शेतकरी चिंतेत असून आता सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.
भाज्यांचे दर
– कोबी, घेवडा, भेंडी आणि दुधी भोपळा यांचे दर १०० ते १२० रुपये प्रति किलो आहेत.
– गवार, दुधी भोपळा, हिरवे वाटाणे आणि घेवडा १६० ते २०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत.
– टोमॅटो ६० रुपये किलो, कोथिंबीर ३० रुपये प्रति जुडी, पुदिना २० रुपये आणि मेथी २५ रुपये प्रति जुडीने मिळत आहे.
– कारले, पडवळ, वांगी आणि बटाट्यांच्या दरात प्रति किलो २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
– स्वयंपाकातील अत्यावश्यक घटक असलेल्या लसूण आणि आल्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
पुरंदरचे सीताफळ बाजारपेठेत दाखल
आपल्या दर्जेदार चवीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पुरंदरच्या सीताफळांची बाजारपेठेत एन्ट्री झाली आहे, मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे या पिकाला मोठा फटका बसला आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने सीताफळ बागा अडचणीत आल्या आहेत. पावसाअभावी यावर्षी सीताफळाची आवक कमालीची घटली असून, बाजारात येणा-या फळांचा आकार लहान आहे आणि अपेक्षित गुणवत्ताही दिसून येत नाही. सध्या बाजारपेठेत दररोज फक्त ४० ते ५० क्रेट्स एवढीच संथ आवक सुरू आहे. गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे सध्या सीताफळाला १००० ते २००० रुपये प्रति क्रेट इतका बाजारभाव मिळत आहे.
















