Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी
मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. ५०, ६० आणि ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट देणारे अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन झाले आहे. सुदेश कुमार यांचे शुक्रवारी (१ मे) मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते सुदेश कुमार यांना सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, आम्ही त्यांना गुरुवारी घरी परत आणले, जिथे आम्ही उपचारांसाठी एक तात्पुरती वैद्यकीय व्यवस्था उभारली होती. परंतु दुस-याच दिवशी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात, १९३१ साली सरहद्दीवरील शहर असलेल्या पेशावर येथे सुदेश यांचा जन्म झाला. सुदेश लहान असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला. पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पैसा’ (१९५७) हा त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. त्यांचे खरे नाव सुदेश धवन असे होते.

१९५९ मध्ये ‘छोटी बहन’ या चित्रपटातील छोट्या कॅमिओने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ‘सारंगा’, ‘छोटी बहन’, ‘भरोसा’, ‘खानदान’, ‘वासू मेनन’ आणि ‘धरती’ असे अनेक गाजलेले चित्रपट केले. त्यानंतर ते निर्मिती क्षेत्राकडे वळले. निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘मन मंदिर’ (१९७०) हा होता. त्यांनी १९७५ मधील ‘उलझन’, ‘बदलते रिश्ते’, ‘ऑफ-बीट’ या चित्रपटांची निर्मिती केली. १९८२ मध्ये जया नाईक यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR