नवी दिल्ली : उद्योगपती नीरव मोदी, संजय भंडारी आणि विजय मल्ल्या यांच्यावरील कारवाईबाबत केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. फरार उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिका-यांचे पथक ब्रिटनला जाणार आहे.
व्यावसायिकांवर कडक कारवाई
संजय भंडारी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह भारतातील व्यावसायिकांच्या प्रत्यार्पणासाठी टीम लवकरच ब्रिटनला रवाना होणार आहे.
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संजय भंडारी या तिघांना ब्रिटनमधून आणले जाणार आहे. ईडीने तिघांची भारतातील मालमत्ता जप्त केली आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या हजारो कोटी रुपयांची संपत्ती विकून पैसे वसूल करण्यात आले आहेत आणि ते बँकांनाही परत करण्यात आले आहेत.
संजय भंडारीवर काय आरोप?
संजय भंडारी हे प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. तपास यंत्रणा 2018 पासून वाड्रा आणि भंडारी यांच्यातील कथित संबंधांची चौकशी करत आहे. भंडारी यांना यूपीए सरकारच्या काळात कमिशन मिळाले आणि हा पैसा त्यांनी लंडनमधील मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचा आरोप आहे. याचा फायदा रॉबर्ट वड्रा यांना झाला.
संजय भंडारी यांनी लंडन आणि दुबईमध्ये मालमत्ता मिळवून त्या रॉबर्ट वड्राचे कथित सहकारी सीसी थम्पीच्या नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र, रॉबर्ट वड्रा हे आरोप सतत फेटाळत आहेत.