नवी दिल्ली : प्रतिनिधी
बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला आहे. या हिंसाचारात अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. बांगलादेशातील अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. याचा फटका कांदा निर्यातीला बसला आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती. मात्र आता येथील हिंसाचाराचा फटका कांदा निर्यातीला बसला आहे.
शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले
बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. मात्र या हिंसाचारामुळे दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजू शेट्टींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतक-यांना फटका बसत असल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रात नमूद केले. बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करून कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याचीही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
कांदा निर्यातीला फटका
बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका थेट भारतातील शेतक-यांना बसत आहे. कांद्याची निर्यात रखडल्यामुळे शेतक-यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. यामुळे बाजारपेठेत कांद्याचे दर देखील वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, १९७१ च्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी ३० टक्के सरकारी नोक-यांमध्ये राखीव असलेली कोटा पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यापूर्वी जेव्हा हिंसाचार उसळला तेव्हा न्यायालयाने कोट्याची मर्यादा कमी केली होती, पण हिंसाचार थांबला नाही. आता आंदोलक रस्त्यावर उतरून हिंसाचार करत आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.