चुराचांदपूर : पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौ-याच्या दोन दिवस आधी, राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला. गुरुवारी रात्री उशिरा, चुराचांदपूरमध्ये हल्लेखोरांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करणारे पोस्टर्स आणि बॅनर फाडले, बॅरिकेड्स पाडले आणि त्यांना आग लावली.
ही घटना चुराचंदपूर पोलिस ठाण्यापासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या पिसोनामुन गावात घडली. पोलिसांनी दंगलखोरांना हाकलून लावले. त्यांनी लाठीचार्जही केला. तथापि, किती लोक जखमी झाले याची माहिती उपलब्ध नाही. अधिका-यांच्या हवाल्याने सांगितले की, मोदी १३ सप्टेंबर रोजी राज्याला भेट देतील आणि ८,५०० कोटी रुपयांची भेट देतील.
मोदी चुराचांदपूर येथील शांती मैदानावरून ७,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. या भागात कुकी लोकांचे वर्चस्व आहे. यासोबतच, पंतप्रधान मैतेई-बहुल क्षेत्र असलेल्या इम्फाळ येथून १,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील.
मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. १३ फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
मणिपूरचे खासदार म्हणाले मोदी कठीण काळात येत आहेत मणिपूरचे एकमेव राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांनी पंतप्रधानांच्या भेटीला राज्यासाठी मोठे भाग्य म्हणून वर्णन केले. एका व्हीडीओ संदेशात ते म्हणाले मोदी लोकांच्या अडचणी ऐकतील ही खूप भाग्याची गोष्ट आहे. मणिपूरमध्ये भूतकाळात हिंसक संघर्षांचा इतिहास आहे. तथापि, अशा काळात कोणत्याही पंतप्रधानांनी राज्याला भेट देऊन लोकांचे म्हणणे ऐकलेले नाही. इतक्या कठीण काळात येथे येणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.
















