23.6 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइस्लामच्या नावावर हिंसाचार

इस्लामच्या नावावर हिंसाचार

दहशतवादाचा सर्वांधिक त्रास मुस्लिमांना इंडोनेशियाने पाकिस्तानला सुनावले

जकार्ता : पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ विविध देशांचे दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर जनता दल (यू) चे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशियातील नेत्यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी इंडोनेशियाने भारताच्या दहशतवादावरील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे समर्थन केले आहे. इंडोनेशियाच्या नेहदलातुल उलेमा कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष केएच उलील अब्शर अब्दुल्ला म्हणाले की, इस्लाममधील काही संघटना इस्लामच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात. दहशतवादाचा सर्वाधिक त्रास इतर कोणत्याही धर्मापेक्षा मुस्लिमांना होतो.

वृत्तसंस्थेशी बोलताना अब्शर अब्दुल्ला म्हणाले, इस्लाममधील काही गट इस्लामच्या नावाखाली हिंसाचाराला प्रोत्साहन देतात हे खरं आहे. इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे, मुस्लिमांना शांतता हवी आहे. मी भारतातून आलेल्या खासदारांना सांगितले की, दहशतवादाचा सर्वाधिक त्रास हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन धर्माला नाही, तर मुस्लिमांना आहे. म्हणूनच मुस्लिमांनी या समस्येला योग्यरित्या सामोरे जाणे गरजेचे आहे.

अब्शर अब्दुल्ला पुढे म्हणतात, दक्षिण आशियातील लोकांना शांतता आणि सौहार्द हवे आहे. दहशतवादाचे उच्चाटन केल्याशिवाय आर्थिक आणि राजकीय स्थिरता येऊ शकत नाही. जर लोकांना धर्माची योग्य समज नसेल आणि हिंसाचाराला वैध ठरवण्यासाठी धर्मांचा वापर केला जात असेल, तर ते खूप धोकादायक आहे. इंडोनेशियाचा इतिहास भारताच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडलेला आहे.

शिष्टमंडळाने घेतली इतर मित्र देशांची भेट
यादरम्यान शिष्टमंडळाने इंडोनेशियात किमान २० मित्र देशांच्या स्थानिक राजदूतांची भेट घेतली. मित्र देशांच्या राजदूतांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्रित जागतिक प्रयत्नांची तातडीची गरज व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR