लंडन : आता अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही भारतीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. सुमारे ९८ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाची तपासणी केली जाणार आहे. कीर स्टार्मर यांच्या सरकारच्या नवीन आदेशांनुसार रँडम व्हिसा तपासणी केली जाईल. अनेक नोकरीच्या ठिकाणी बेकायदा काम करणारे विद्यार्थी आढळल्याने हे घडले आहे. या निर्णयामुळे ९८ हजार भारतीय विद्यार्थ्यांना स्थलांतरित विभागाच्या रडारवर आणले आहे.
विद्यार्थ्यांची व्हिसाची कुठेही तपासणी केली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ब्रिटन सरकारने ओव्हरस्टेसाठी दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना व इतर व्हिसाधारकांना हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळेत आठवड्यातून २० तास काम करण्याची परवानगी आहे. म्हणजे महाविद्यालये आणि विद्यापीठे चालू असतात तेव्हा आणि सुट्टीच्या वेळी आठवड्यातून ४० तास काम करण्याची परवानगी आहे. मात्र त्याचे उल्लंघन दिसून आले.
ब्रिटनमध्येही विद्यार्थी व्हिसाच्या नावाखाली तस्करीची काही प्रकरणे नोंदवली गेली. हे लोक एजंट्सद्वारे येथे येतात आणि काही महिन्यांनी शिक्षण सोडतात. त्यानंतर त्यांना येथे काम मिळते. बहुतेक जण दक्षिण लंडन आणि मँचेस्टरसारख्या भागात काम करतात. तपास संस्थांना टाळण्यासाठी ते रोखीने पैसे स्वीकारतात. कामाच्या ठिकाणांच्या मालकांनाही फायदा होतो. कारण त्यांना या लोकांना प्रति तास १० पौंड किंवा अंदाजे एक हजार रुपये या अकुशल दरापेक्षा खूपच कमी पैसे देता येऊ शकतात. अर्थात, कायद्यातून पळवाट शोधली जाते.
भारतीय ओव्हर स्टेमुळे बेपत्ता
ब्रिटनच्या गृह कार्यालयाच्या मते २०२० मध्ये २० हजारांहून अधिक भारतीय ओव्हर स्टे करत होते ते सर्व आता बेपत्ता झाले आहेत. कोविडनंतर यूकेने ओव्हरस्टेचे रेकॉर्ड जारी करणे थांबवले आहे. इमिग्रेशन यूके या संस्थेच्या मते ओव्हरस्टे करणा-यांची सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील आहे. यूकेमध्ये ओव्हरस्टे करणा-यांत सर्वाधिक संख्या विद्यार्थी व्हिसावरील आहे.नंतर पर्यटक व्हिसाचा क्रमांक लागतो. नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांना २४ ऐवजी फक्त १८ महिने ब्रिटनमध्ये वास्तव्य करता येईल. यानंतरही एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा व्हिसा वाढवायचा असेल तर त्यांना संबंधित महाविद्यालयाकडून एक पत्र द्यावे लागेल.
विशेष इमिग्रेशन टीम तयार
ट्रम्प सरकारने अमेरिकेत स्थलांतरितांना पकडण्यासाठी आयसीई टीम स्थापन केली आहे. स्टार्मर सरकारनेही अशाच प्रकारे एक विशेष इमिग्रेशन टीम तयार केली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये असलेली ही पथके महाविद्यालये आणि कामाच्या ठिकाणी अचानक तपासणी करतात. या टीममुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विद्यार्थी व्हिसा, पासपोर्ट कागदपत्रे सोबत नेतात. यूके पोलिसांनी बेकायदा स्थलांतरितांना पकडण्यासाठी माहिती देणा-यांची एक टीम तयार आहे. अलीकडेच कोव्हेंट्री विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी नागप्पन याला एका दुकानात ओव्हरटाइम काम करणा-या विशेष टीमने पकडले. गेल्या वर्षी वेस्ट मिडलँड्सच्या कारखान्यात बेकायदा काम करणा-या १२ भारतीयांनाही अटक केली होती.
















