रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे गोडाऊनच्या बांधकामादरम्यान लोखंडी शेड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ कामगार जखमी झाल्याचे वृत्त असून, आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे कस्तुरी लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनच्या शेडचे बांधकाम सुरू होते. यावेळी अचानक संपूर्ण लोखंडी शेड कोसळले. शेडचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेड आणि बांधकामाचे साहित्य अंगावर पडल्याने अनेक कामगार त्याखाली अडकल्याचे वृत्त समोर आले.
घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
२० ते २५ कामगार जखमी; एकाचा मृत्यू
या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी आठ कामगार गंभीर जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी सुमारे ३० ते ३५ कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेडच्या ढिगा-याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याबाबत तपासणी आणि बचावकार्य सुरू आहे.
















