तेहरान : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. हमास प्रमुख इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर इराणने इस्रायला धमकी दिली. याचा बदला घेणार असल्याचं इराणने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये ही अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अनेक देशांनी या दोन्ही देशांचा प्रवास टाळावा अशा सूचना जारी केल्या आहेत.
इस्रायलने मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकरला ठार केले आबे. इस्रायलने आपल्या शत्रूंना ठार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. हमासचे अनेक मोठे नेते आणि दहशतवादी त्यांनी ठार केले आहेत. अजूनही त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार केले जात आहे.
इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुखाची हत्या केल्याने तणावात आणखी वाढ झाली. या हत्येत इस्रायलचा हात असल्याचा दावा इराणने केला. अधिकृतपणे फुआद शुकरच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने घेतली. पण हनियाच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने घेतलेली नाही. आखाती देशांमध्ये राहणा-या भारतीयांना भारत सरकारने सूचना जारी केल्या आहेत. इस्त्रायल आणि इराणमध्ये राहणा-या भारतीयांची चिंता ही वाढली आहे.
भारतासह इतर अनेक देशांतील नागरिकांना येथे प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तणाव वाढत असताना इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. एअर इंडियाने इस्रायलमधील तेल अवीव येथे जाणारी आणि त्या मार्गाने जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत.