सोलापूर : उजनी धरणाचे पाणी देगाव कालव्यामार्फत दक्षिण सोलापूर तालुक्याला देणारी योजना मागील १२ वर्षांनंतर आता मार्गी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून राईट्स कंपनीमार्फत देगाव जोड कालव्याचे काम पूर्ण केले जात आहे. तीन महिन्यांत काम पूर्ण होणार असून त्यानंतर दक्षिण सोलापुरातील तब्बल चार हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळणार आहे.
उजनी धरणातील पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. दुसरीकडे धरणातील पाण्यातून काही मध्यम व लघू प्रकल्पांमध्येही पाणी सोडले जाते. त्यामुळे देखील काही प्रमाणात जमिनीला पाणी मिळाले आहे. आता दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ७२ गावांसाठी असलेल्या एकरूख योजनेतूनही पाणी सोडण्यात आले आहे. दुसरी खुशखबर म्हणजे देगाव जोड कालव्याच्या कामालाही तब्बल १२ वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. २६ किलोमीटर या कालव्याचे काम रेल्वे पुलामुळे रखडले होते. त्याला आता मान्यता मिळाली असून रेल्वे प्रशासनामार्फत राईट्स ही कंपनी उर्वरित देगाव कालव्याचे काम करीत आहे. निविदा प्रक्रिया झाली असून मार्च २०२४पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे यांच्या पाठपुराव्यामुळे १२ वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण होत आहे.
देगाव जोड कालवा २६ किलोमीटरचा असून त्याचा सर्वाधिक लाभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हा कालवा पूर्ण झाला होता, पण देगाव जवळील रेल्वे पुलामुळे काम प्रलंबित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता त्या राहिलेल्या कामासाठी १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यावर कालवा संपल्यानंतर बंद पाईपलाईनद्वारे पाणी सिंचनासाठी वापरले जाईल. त्याद्वारे सुमारे चार हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे यांनी दिली.