नांदेड : प्रतिनिधी
वजीराबाद गुन्हेशोध पथकाने अबचलनगर परिसरातील तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड टाकून ५ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने व जुगार साहित्य असा एकूण ३ लाख ५५ हजार ३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबचलनगर परिसरातील झुलेलाल मंदिर, रूम क्र. ३०९ येथे काही इसम पैशांवर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती विजराबाद गुन्हेशोध पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा टाकला. छाप्यावेळी ५ जण गोलाकार बसून पैशांवर तिर्रट जुगार खेळत होते.आरोपी रवी गवळे (रा. गुरुवारबाजार, सिडको), विकास रामराव सरपाते (रा. गुरुवार बाजार, सिडको),मुकेश पांडुरंग लोळगे ( रा. भोजालाल गवळी चौक),चंद्रशेखर गणपतराव पवार (रा. सिडको),अतुल भगवानराव वाडे ( रा. गुरुवार बाजार, सिडको) वर कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडून २५,३०० रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, ५ मोबाईल फोन (१.१० लाख) तसेच ४ दुचाकी वाहने ( २.२० लाख) असा एकूण ३,५५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक लोढे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे व विजराबाद गुन्हेशोध पथकातील अधिकारी-कर्मचा-यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.















