ताडकळस : परभणी-ताडकळस-पालम मार्गावर सध्या उपलब्ध असलेल्या एसटी बसफे-या अपु-या असल्याने विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर अतिरिक्त नियमित एस.टी. बसफे-या सुरू कराव्यात, अशी मागणी साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगाराकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मार्गावरील विविध गावांमधून विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांसाठी, नागरिक शासकीय कार्यालये, रुग्णालये तसेच विविध कामांसाठी परभणी, ताडकळस व पालम येथे दररोज प्रवास करतात. मात्र बसफे-या कमी असल्याने प्रवाशांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. उपलब्ध बसमध्ये मोठी गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळा, महाविद्यालयात पोहोचताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवशाही बससेवेला विरोध
परभणी-ताडकळ-पालम मार्गावर शिवशाही बससेवा सुरू करण्याऐवजी नियमित साधी एसटी बसफे-यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शिवशाही बसचे प्रवासभाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून नियमित एसटी बससेवेलाच प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळच्या व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विशेष बसफे-या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन सोनकांबळे यांनी परभणी आगाराच्या अधिका-यांकडे दिले.
















