मुंबई : आर्यभट्ट का झिरो या चित्रपटाच्या प्रमोशनावेळी अभिनेता हिमांश कोहली, अभिनेत्री सोनाली सहगल आणि दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनाबद्दल, नीट-यूजीसह विविध परीक्षांमधील पेपरफुटीबद्दल आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल आपले मत मांडले. हिमांश म्हणाला की देशाच्या आणि येणा-या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी आवाज उचलणा-यांचे ऐकले पाहिजे.
सोनालीने हा मुद्दा राजकारणापलीकडचा असल्याचे सांगत सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त केली. कमल चंद्रा म्हणाले की, फक्त सरकारला दोष देऊन मार्ग निघणार नाही, तर व्यवस्थेच्या मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माझ्या कारकिर्दीत तरुणांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. माझ्या टीव्ही शोपासून ते आर्यभट्ट का झिरो या चित्रपटापर्यंत, माझे काम तरुणांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या शिक्षणासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी आवाज उचलणा-या तरुणांचे ऐकले पाहिजे. मी सोनम वांगचुक यांचा खूप आदर करतो. त्यांनी देशासाठी, विशेषत: भारतीय सेना आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या विचारसरणीने आणि कामामुळे मलाही प्रेरणा मिळाली आहे. आजची जेन झी(नवीन पिढी) आपले म्हणणे धैर्याने मांडते. आमच्या पिढीतील लोक इतके खुलेपणाने आपले म्हणणे मांडू शकत नव्हते. तरुण केवळ धाडसीच नाहीत, तर ते सर्जनशीलही आहेत. जर त्यांची मागणी देशाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी असेल, तर मी त्यांच्यासोबत उभा आहे. माझी इच्छा आहे की सर्व पक्षांनी चर्चेद्वारे तोडगा काढावा.
















