मुंबई : प्रतिनिधी
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी-शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार त्यांना भेटायला गेले ते त्यांना भेटत नाहीत. या व्होटचोर ज्ञानेशकुमारला काँग्रेस कार्यकर्ते महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाहीत आला तर त्याच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार संविधानिक पदावर बसून भाजपच्या एजंटप्रमाणे वागत आहेत. त्यांनी देशातील लोकशाहीची हत्या केली असून या देशद्रोहीविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. संपूर्ण देश रस्त्यावर उतरून ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांच्या नियोजित दौ-यांमध्ये सातत्याने बदल होत असून मेरठ वाराणसीनंतर आता ७ व ८ ऑक्टोबर रोजीचा छत्तीसगड दौराही स्थगित करण्यात आला आहे. फॉर्म ६ मध्ये बेकायदा बदल करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. या पापाची शिक्षा ज्ञानेशकुमार आणि संरक्षण देणा-या आकांना भोगावीच लागणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मतदारांच्या हक्कांसाठी आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी संघर्ष करत राहील असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
















