अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येच्या राम मंदिरातील दान चोरीप्रकरणी ‘एसआयटी’चा तपास वेगात सुरू असून आता नवनवीन खुलासे होत आहेत. एसआयटी ट्रस्टशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे, तर दुसरीकडे मंदिराच्या कामकाजात गुंतलेल्या कर्मचा-यांचीही चौकशी केली जात आहे. याच दरम्यान, रामलल्लाचे हार आणि पादुकाही गायब करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचीही चोरी झाली असण्याची शंका व्यक्त होत आहे.
एसआयटीने गुरुवारी या प्रकरणात मंदिरात आलेल्या दानाची तपासणी केली, तसेच दानाची मोजणी आणि ते बँकेत जमा करण्याच्या प्रक्रियेचीही पडताळणी केली जात आहे. तपास पथक दानपात्रांमधील रोकड आणि सोने-चांदी, हि-याचे दागिने मोजणी केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेचा कसून शोध घेत आहे. एसआयटीने काल पुन्हा एकदा गोपाळ राव आणि टिन्नू यादव यांची चौकशी केली आहे. राम मंदिराच्या पुजा-यांकडेही हिरे जडित हार आणि पादुकांबद्दल विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे.
यावर पुजा-यांनी सांगितले की, हार आणि पादुका परिधान केल्यानंतर टिन्नू यादव याच्याकडे परत करण्यात आल्या होत्या. तर टिन्नूने दावा केला की, या वस्तू वितळवून सोन्याच्या विटा बनवण्याचं ठरलं होतं. दुसरीकडे दागिने सांभाळणारे कृष्ण देव तिवारी यांच्याकडे विचारणा केली असता, तिथे सोन्याची वीटही सापडली नाही आणि कोणती पावतीही मिळाली नाही. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज, बँकिंग रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
६० हून अधिक लोकांची चौकशी
तपास यंत्रणांनी आतापर्यंत अनेक कर्मचारी, सेवाधारी आणि दान मोजणी प्रक्रियेशी संबंधित लोकांची चौकशी केली आहे. आतापर्यंत ६० हून अधिक लोकांची चौकशी झाली असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तथ्यांची पडताळणी करण्यासाठी काही लोकांची एकापेक्षा जास्त वेळा चौकशी करण्यात आली आहे.
दोषीला सोडले जाणार नाही
तपासादरम्यान काही डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचीही तपासणी सुरू झाल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे. संपूर्ण घटनेमागील सत्य समोर आणण्यात तांत्रिक पुरावे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे अधिका-यांचे मत आहे. विरोधक या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत असताना सरकारचे म्हणणे आहे की कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि तपास पूर्ण पारदर्शकतेने पुढे जाईल. सध्या एसआयटीचा तपास सुरू असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
















