32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपाला हवेय ते होणार नाही

भाजपाला हवेय ते होणार नाही

प्रकाश आंबेडकरांची सूचक प्रतिक्रिया!

मुंबई : ‘भाजपाला जे हवंय ते होईल असं मला वाटत नाही. कारण आता मतविभागणीवर परिणाम होईल असे दिसत आहे. लोकांनी कुणाला मत द्यायचे याबाबतचा त्यांचा निर्णय जवळपास निश्चित केलाय असे दिसत आहे’, दरम्यान, अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा एकीकडे रंगत असताना दुसरीकडे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती जनतेला पटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘मी महाराष्ट्रात जिथे जिथे गेलो, तिथे लोकांची मानसिकता समोर आली आहे. महाराष्ट्रात कधीही एवढे वाद नव्हते. स्थिर सरकार असायचे.निकालाच्या दिवशी बोंबाबोंब व्हायची. पण अंतिम निकाल मान्य व्हायचा आणि पाच वर्षं सरकार चालायचं. मात्र आता पक्ष फोडणे, गोळीबार करणे, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणावर चाललेले आहे. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे मराठी माणूस निवडणुकीची वाट पाहात आहे हे दिसतंय’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, येत्या १५ तारखेला राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निकाल देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘१५ तारखेला राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निकाल देणार? याची सध्या चर्चा आहे. भाजपाला वाटत असेल की या निकालामुळे ते अधिक सुरक्षित होतील. पण मला परिस्थिती कठीण दिसते आहे’’, असे आंबेडकर म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला किती नुकसान होईल? अशी विचारणा केली असता प्रकाश आंबेडकरांनी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं म्हटलं आहे. ‘‘या पक्षप्रवेशामुळे इतर पक्षांना धक्का वगैरे बसेल असं वाटत नाही. कोणताही मोठा नेता पक्षातून गेल्यामुळे पक्षाला त्रास तर होतो. पण पक्ष म्हणून व्यापक परिणाम होत नाही. त्यामुळे एखाद-दुस-या नेत्याने जाणं धक्कादायक आहे, पण त्यामुळे पक्षावर व्यापक परिणाम होतो असे मी मानत नाही’, असे आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR