26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रमाझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?

माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?

जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम

सांगली : भाजप आता देशात नव्हे तर जगातला सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. त्यांच्याकडे इतकी मोठमोठी लोकं जात आहेत. त्यामुळे तिथे माझ्यासारख्या गरिबाचे काय काम, असा सवाल करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, पक्षप्रवेशाची चर्चा ही माध्यमांमध्येच आहे. कदाचित भाजपवाल्यांनाही तसे वाटत नसेल. मुख्यमंत्र्यांसमवेत माझ्या भेटी विरोधी पक्षनेता म्हणून होत आहेत. इतर कामांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? अशा भेटीवरून कोणीही गैरसमज निर्माण करून घेऊ नये. ते म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील ही कृष्णाकाठची माणसे विचाराला पक्की होती. त्याच विचाराने सर्वांनी पुढे जाणे गरजेचे होते. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे काहीजण वेगळे निर्णय घेत आहेत. आज कोण कुठल्या पक्षात जाईल, याचा नेम राहिलेला नाही.

एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांना जेरीस आणायचे आणि नंतर त्यालाच पक्षात प्रवेश द्यायचा, ही महाराष्ट्रात सध्याची राजकारणाची नवी पध्दत सुरू झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला की, संबंधितांवरील सर्व आरोप निघून जातात. जे लोक त्यांच्यावर टीका करायचे, तेच लोक आता त्यांचा हार घालून सत्कार करताहेत. सर्वांना सत्तेत जायची घाई झालेली आहे. पक्षप्रवेशातून भाजप नेत्यांना राज्याकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नाही.

पूर येऊ नये, यासाठी प्रार्थना
जयंत पाटील यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर भाष्य केले. यावर्षी पूर येऊ नये, अशी प्रार्थना करतो. पूर येऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्यवेळी पाणी सोडले पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR