23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रयुद्ध असो वा शांती संविधान देशाला एकसंघ ठेवण्यास समर्थ

युद्ध असो वा शांती संविधान देशाला एकसंघ ठेवण्यास समर्थ

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी असे संविधान तयार केले जे एकाचवेळी केंद्रीकृत आणि संघराज्यीय स्वरूपाचे आहे. युद्धाचा काळ असो वा शांततेचा, हे संविधान संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्यास समर्थ आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी येथे केले.

संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानंतर, प्रत्येक संकटाच्या वेळी भारत एकसंघ राहू शकला, ही या संविधानाचीच किमया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रास्ताविका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, वित्त राज्यमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई म्हणाले, ज्या ऐतिहासिक नागपुरात १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्या भूमीत ‘संविधान प्रस्ताविका पार्क’चे उद्घाटन होणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि गौरवाचे आहे. नागपूरच्या मध्यभागी असलेला संविधान चौक हा देशाच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेल्या नागपूरात नागपूरकरांनीच साकारलेला असून तो या शहराच्या संविधाननिष्ठ भूमिकेचे प्रतीक असल्याचेही सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले. संजय सिरसाठ यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थ सहाय्यासहीत अन्यबाबींचा परामर्श घेतला.

संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी पार्कच्या निर्मितीमागचा इतिहास उलगडला. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे यांनी स्वागतपर भाषण केले. माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. तर विधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी आभार मानले.

कलम ३७० बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत
कलम ३७० हे बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नव्हते. या देशाला एकच संविधान अभिप्रेत आहे. कलम ३७० हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार नव्हते असे स्पष्ट मत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. जेव्हा यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात आली, तेव्हा एकमताने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवण्यात आला असेही त्यांनी नमूद केले.

उद्देशिका हा संविधानाचा गाभा : फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ई-ग्रंथालयासाठी एक कोटी : गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या विधी महाविद्यालयातून देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी न्यायमूर्ती आणि राष्ट्रपती हिदायतुल्ला यासारखे गौरवशाली परंपरा लाभलेले विद्यार्थी होऊन गेले. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील भावना ही अनुभवता येईल. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या ई-ग्रंथालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR