22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रव्हिट्स हॉटेल प्रकरणाची ‘हाय पॉवर कमिटी’ मार्फत होणार चौकशी

व्हिट्स हॉटेल प्रकरणाची ‘हाय पॉवर कमिटी’ मार्फत होणार चौकशी

छत्रपती संभाजीनगर : येथील विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक हाय पॉवर समिती नियुक्त केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाचा ८ दिवसांच्या आत तपास करून आपला अहवाल सादर करणार आहे.

मंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील ११० कोटींचे सुप्रसिद्ध हॉटेल व्हिट्स अवघ्या ६८ कोटींत खरेदी करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर शिरसाट यांनी या सौद्यातून काढता पाय घेतला. पण आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमल्यामुळे मंत्री शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारच्या परिपत्रकानुसार, प्रस्तुत समिती धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी, शर्ती किंवा इतर प्रक्रियेत कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी करणार आहे.सदर समितीला धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावात निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी अहवाल समितीच्या शिफारशी व अभिप्रायांसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह ८ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिलेत. या पत्रकावर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची स्वाक्षरी आहे.

समितीत कुणाचा समावेश?
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वातील या समितीत संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागारे, उपायुक्त कामगार विभाग, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सह जिल्हा निबंधक, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे. या व्यतिरिक्त समिती अध्यक्षांना जे अधिकारी सदर समितीत आवश्यक वाटतील त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही देण्यात आलेत.

सरकार पांघरून घालतेय : दानवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या समितीवरून सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, ज्या कार्यालयातुन विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यव्हार प्रकरणाच्या फाईली फिरल्या, त्याच कार्यालयांचे अधिकारीच आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचा आदेश निघाला आहे. ही कसली हाय पॉवर कमिटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी? हे तर प्रकरणावर स्पष्टपणे पांघरूण घालणे झाले.

नेमके काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर हे हॉटेल कमी किंमतीत विकण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. तसेच हे हॉटेल खरेदी करण्यासाठी शिरसाट यांच्याकडे पैसे आले कुठून? असाही सवाल त्यांनी केला होता. या आरोपांनंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR