25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्रसिडकोत मलिदा खाताना का थांबावेसे वाटले नाही?

सिडकोत मलिदा खाताना का थांबावेसे वाटले नाही?

आता वय पुढे करून पळ काढू नका रोहित पवारांचे मंत्री शिरसाटांना खडे बोल

पुणे : राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांची शाळा घेतली.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मी १० वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे. संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की, कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आणण्यासाठीची ही भूमिका आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून रोहित पवारांनी ट्विट करून संजय शिरसाटांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
संजय शिरसाट, सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचे नुकसानच होणार आहे. पण आता वय पुढे करून पळ काढू नका. सरकारची ५-६ हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. आता सुट्टी नाही असा इशारा रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला.

राहिला प्रश्न माझ्याबाबत तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांना दिले.

आणखी एका मंत्र्याची विकेट?
शिरसाट यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असून आता विरोधक अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सिडको जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर शिरसाट काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, विरोधकांना सरकारमधील आणखी एका मंत्र्याची विकेट पाडण्याचे श्रेय मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?
मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्षे आमदार म्हणून काम केले आहे. जे स्वप्नातही पाहिले नव्हते, ते सर्व अनुभवले आहे. मात्र, वाढते वय माणसाला काही गोष्टी थांबवण्यास भाग पाडते. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का? असा प्रश्न मनात आला आहे. आता थांबले पाहिजे, असा विचार मी मनाशी करत आहे असे संजय शिरसाट म्हणाले होते. यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही. मी आता ६४ वर्षांचा आहे. लवकरच मी ६५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो. मला २०२९ पर्यंतचा काळ आहे. २०२९ साली मी ६९ वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावे याचा विचार तर केलाच पाहिजे ना, असे म्हणत त्यांनी राजकारणातील निवृत्तीचे संकेत दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR